नांदेड : अशोक तेलंग
दि. २७ ते ३१ जानेवारी २०२६ दरम्यान नांदेड येथे पार पडलेल्या ६९ व्या शालेय राष्ट्रीय नेटबॉल स्पर्धेत महाराष्ट्र राज्याच्या संघाने दमदार कामगिरी करत राष्ट्रीय पातळीवर आपला दबदबा सिद्ध केला. १४ वर्षे मुले, १४ वर्षे मुली आणि १७ वर्षे मुली या तिन्ही गटांत प्रथम क्रमांक पटकावत महाराष्ट्राने राष्ट्रीय विजेतेपदाचा मान मिळवला.
या स्पर्धेत सांदीपणी पब्लिक स्कूलच्या कु. रक्षिता रविकुमार बकवाड हिने १४ वर्षे मुलींच्या गटात महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत उत्कृष्ट खेळाचे दर्शन घडवले. तिच्या चपळ हालचाली, अचूक पासिंग आणि संघभावनेमुळे संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलत तिने सुवर्णपदक पटकावले. तिच्या या उल्लेखनीय कामगिरीमुळे शाळा, जिल्हा आणि राज्याच्या क्रीडा क्षेत्रात अभिमानाची भर पडली आहे.
रक्षिताने यापूर्वीही आपल्या क्रीडाप्रतिभेची छाप उमटवली आहे. केरळ येथे झालेल्या राष्ट्रीय सेपकटाकरॉ स्पर्धेत तिने कांस्यपदक मिळवून आपली गुणवत्ता सिद्ध केली होती. सध्या ती मेजर ध्यानचंद क्रीडा युवक मंडळ व व्यायामशाळा येथे नेटबॉल आणि सेपकटाकरॉ या दोन्ही खेळांचे नियमित व शिस्तबद्ध प्रशिक्षण घेत आहे.
तिच्या या यशाबद्दल नांदेड जिल्हा नेटबॉल असोसिएशनचे सचिव प्रवीणकुमार कुपटीकर, राज्य संघटनेचे अध्यक्ष सतीश इंगळे, संस्थाचालक सुनील राठोड, जिल्हा क्रीडा अधिकारी जयकुमार टेंभरे तसेच शाळेच्या प्राचार्या क्रांती कुळकर्णी यांनी तिचे मनःपूर्वक अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
रक्षिताच्या या सुवर्णयशामुळे जिल्ह्यातील इतर खेळाडूंना नवी प्रेरणा मिळाली असून भविष्यात ती राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचे नाव उज्ज्वल करेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Post a Comment