लातूर (अशोक पाटील तेलंग 9665556510 )
मराठवाड्याच्या मातीतून उमललेल्या प्रतिभेने पुन्हा एकदा मुंबईच्या झगमगत्या मंचावर आपली ताकद सिद्ध केली आहे. लातूरच्या अनन्या गणेश साळुंके आणि आरोही गणेश साळुंके या दोन बहिणींनी मुंबईत पार पडलेल्या प्रतिष्ठित All India International Fashion Show मध्ये आपल्या देखण्या उपस्थितीने आणि आत्मविश्वासपूर्ण सादरीकरणाने प्रेक्षकांची मने जिंकत मानाचा पुरस्कार पटकावला.
देशभरातील १५ नामांकित डिझायनर्ससाठी तब्बल ५०० मॉडेल्सची निवड करण्यात आली होती. या स्पर्धात्मक वातावरणात स्वतःची वेगळी छाप उमटवणे ही मोठी कसोटी होती. मात्र, अनन्या आणि आरोही यांनी रॅम्पवर टाकलेले प्रत्येक पाऊल आत्मविश्वास, सौंदर्य आणि परिपक्वतेची साक्ष देणारे ठरले.
या भव्य फॅशन शोची संकल्पना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे दिग्दर्शक Charles William यांची होती. कार्यक्रमाचे आयोजन कुशल आयोजक Sonal Mhatre आणि Sushant Bhoir यांनी केले होते. मुंबईतील नामांकित Sai Palace Garden येथे हा सोहळा दिमाखात पार पडला. देश-विदेशातील दिग्दर्शक, निर्माते आणि फॅशन क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत या दोन्ही बहिणींनी केलेले सादरीकरण विशेष ठरले.
ग्रामीण पार्श्वभूमीतून येत असतानाही मोठ्या व्यासपीठावर ठाम उभे राहण्याची ताकद अनन्या–आरोही यांनी दाखवून दिली. यापूर्वीही त्यांनी विविध राज्यस्तरीय आणि राष्ट्रीय स्पर्धांमध्ये उल्लेखनीय यश संपादन केले असून, त्यांचा आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण मेहनत हीच त्यांच्या यशाची गुरुकिल्ली ठरली आहे.
मराठवाड्याच्या या कन्यांनी केवळ पुरस्कार जिंकला नाही, तर ‘स्वप्न पाहण्याची हिंमत असेल तर यश तुमच्यापर्यंत नक्की येते’ हा संदेशही दिला आहे. लातूरसह संपूर्ण मराठवाड्यासाठी हा क्षण अभिमानाचा असून, त्यांच्या या यशोगाथेने अनेक तरुणींना नवे स्वप्न पाहण्याची प्रेरणा दिली आहे.
अनन्या आणि आरोही साळुंके यांच्या पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा — कारण ही तर त्यांच्या यशस्वी प्रवासाची केवळ सुरुवात आहे!

Post a Comment