⚡ ब्रेकिंग News

शासन सेवा एका छताखाली; बारूळ येथील महसूल समाधान अभियानाला भरघोस प्रतिसाद

 सूर्यकांत वाघमारे बारूळकर



कंधार तहसील कार्यालयाच्या वतीने नागरिकांच्या तक्रारींचे तात्काळ निराकरण व्हावे तसेच महसूल विभागाच्या विविध योजना व सेवा थेट नागरिकांपर्यंत पोहोचाव्यात या उद्देशाने ‘छत्रपती शिवाजी महाराज महसूल समाधान अभियान’ अंतर्गत विशेष शिबिराचे आयोजन करण्यात आले. बारूळ येथील महादेव मंदिर परिसरात पार पडलेल्या या शिबिरास बारूळ महसूल मंडळातील गावांमधून शेतकरी व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

या अभियानाच्या माध्यमातून महसूल विभागाच्या विविध योजना, सेवा व प्रमाणपत्रे नागरिकांना एका छताखाली उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे अनेक शेतकरी व नागरिकांच्या विविध समस्या आणि प्रलंबित कामांना तात्काळ मार्ग मिळाला.

हे शिबिर उपविभागीय अधिकारी कंधार विलास नरवटे आणि तहसीलदार रामेश्वर गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आले. दिनांक ७ मार्च २०२६ रोजी झालेल्या या कार्यक्रमाला तहसीलदार श्री. रामेश्वर गोरे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी नायब तहसीलदार भोसीकर साहेब, मोदीराज साहेब, पावडे साहेब, आरोग्य विभागाचे डॉ. साखरे, मृद व जलसंधारण विभागाचे अभियंता गायकवाड, शिक्षण विभागाचे विस्तार अधिकारी श्री. पाटील, तालुका उपअधीक्षक भूमी अभिलेख बळवंत नरवटे, महिला व बालविकास विभागाचे श्री. राजुरे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे श्री. सुमित पाटील, सहाय्यक निबंधक सहकारी संस्था विभाग तसेच पशुसंवर्धन विभागाचे प्रतिनिधी उपस्थित होते.

या शिबिरात विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आपल्या विभागाशी संबंधित योजना, सेवा आणि सुविधा यांची सविस्तर माहिती उपस्थित नागरिकांना दिली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक तहसीलदार श्री. रामेश्वर गोरे यांनी केले, तर सूत्रसंचालन ग्राम महसूल अधिकारी पी. ए. मुंडे यांनी केले.

कार्यक्रमादरम्यान बारूळ महसूल मंडळातील अनेक शेतकरी व नागरिकांना विविध प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. यामध्ये सातबारा उतारे, आठ-अ उतारे, शिधापत्रिका तसेच इतर शासकीय कागदपत्रांचे वाटप करण्यात आले. शिबिरात प्रत्येक विभागाचे स्वतंत्र स्टॉल उभारण्यात आले होते. त्या स्टॉलवर विभागीय कर्मचाऱ्यांनी शेतकरी व नागरिकांच्या विविध प्रश्नांना उत्तरे देत मार्गदर्शन केले, अर्ज स्वीकृत केले आणि अनेक समस्यांचे तातडीने निराकरण करण्याचा प्रयत्न केला.

या कार्यक्रमाला बारूळ गावातील दिगंबर पाटील वडजे, महाजन कांबळे, ग्रामविकास अधिकारी आदमपूरकर साहेब, तलाठी मुंडे साहेब, शब्बीर शेख, बाबूसाहेब, पोलीस पाटील संजय पाटील जाधव, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष गोविंद पाटील वळशिंगे, मारुती पाटील मजरे, उदय पाटील जाधव, तेलूरचे पोलीस पाटील अमोल पाटील, बारूळ प्राथमिक आरोग्य केंद्राच्या १०२ रुग्णवाहिकेचे चालक गोविंद पाटील इंगळे यांच्यासह बारूळ मंडळातील अनेक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

बारूळ महसूल मंडळाच्या सहकार्याने हे शिबिर यशस्वीरित्या पार पडले असून, नागरिकांना एकाच ठिकाणी विविध शासकीय सेवा उपलब्ध झाल्याने उपस्थितांनी समाधान व्यक्त केले.







Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...