माहूर
दत्तशिखर मठसंस्थान माहूर येथील आदरणीय मठाधिपती मधुसूदनजी महाराज मालक भारती यांचे वयाच्या ९९व्या वर्षी काल शांतपणे देवाज्ञा झाली. त्यांच्या निधनाने संपूर्ण दत्तभक्तांमध्ये हळहळ व्यक्त होत असून एक युग संपल्याची भावना व्यक्त केली जात आहे.
मधुसूदनजी महाराज यांनी आपल्या दीर्घ आयुष्यात अध्यात्म, साधना आणि समाजप्रबोधन यांचा अद्वितीय संगम घडवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली दत्तशिखर मठसंस्थेची कीर्ती राज्यभर पसरली. साधेपणा, त्याग आणि भक्ती यांचा आदर्श त्यांनी आयुष्यभर जपला.
त्यांच्या जाण्याने निर्माण झालेली पोकळी भरून काढण्यासाठी मठसंस्थेच्या परंपरेनुसार ईश्वर चिट्टीद्वारे नवीन मठाधिपतींची निवड करण्यात आली. यामध्ये श्याम महाराज भारती यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडीमुळे भक्तांमध्ये समाधान व्यक्त होत असून मठसंस्थेची परंपरा सक्षम हातात गेल्याची भावना व्यक्त होत आहे.
श्याम महाराज भारती हे आध्यात्मिक परंपरेचे ज्ञाता असून गुरूंच्या शिकवणीचा वारसा पुढे नेण्याची त्यांची तयारी आहे. येत्या काळात दत्तशिखर मठसंस्थेचे कार्य अधिक व्यापक होईल, असा विश्वास भक्तांनी व्यक्त केला आहे.
दरम्यान, मधुसूदनजी महाराज यांच्या पार्थिवावर भावपूर्ण वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. हजारो भाविकांनी उपस्थित राहून आपल्या गुरूंना अश्रुपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
“गुरू गेले, पण त्यांचे विचार आणि मार्गदर्शन सदैव अमर राहील,” अशा शब्दांत भक्तांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

Post a Comment