१५१९ दिवसांची अखंड हरित साधना : ‘फॉरेस्ट मॅन’ वनपाल शिवशंभू घोडके यांची प्रेरणादायी वाटचाल

 कंधार (अशोक पाटील तेलंग)

पर्यावरण संवर्धन ही केवळ जबाबदारी नाही तर ती एक साधना आहे, हे आपल्या कृतीतून सिद्ध करणारे नाव म्हणजे वनपाल शिवशंभू घोडके. मागील तब्बल १५१९ दिवसांपासून अखंडपणे दररोज एक झाड लावण्याचा संकल्प त्यांनी जपला आहे. “दररोज एक झाड” या चळवळीअंतर्गत त्यांनी सातत्याने वृक्षलागवड करत एक हरित इतिहास घडवला आहे.

मूळचे पानघोषी येथील असलेले शिवशंभू घोडके सर यांना परिसरात प्रेमाने ‘फॉरेस्ट मॅन’ म्हणून ओळखले जाते. त्यांच्या अथक परिश्रमामुळे अनेक ओसाड माळराने आज हिरवाईने नटली आहेत. केवळ झाडे लावणे नव्हे, तर त्यांचे संगोपन, संरक्षण आणि वाढ याकडेही ते तितक्याच जबाबदारीने लक्ष देतात.

१५१९ दिवस म्हणजे सलग चार वर्षांहून अधिक काळ — पाऊस असो, उन्हाळा असो किंवा कडाक्याची थंडी — त्यांच्या वृक्षसेवेचा संकल्प कधीच ढळला नाही. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी नागरिक, विद्यार्थी आणि युवकांमध्ये पर्यावरणाबद्दल जागृती निर्माण केली आहे. त्यांच्या कार्यामुळे अनेकांनीही दररोज एक झाड लावण्याचा संकल्प स्वीकारला आहे.

आज पर्यावरणाचा समतोल ढासळत असताना, अशा व्यक्तींची समाजाला नितांत गरज आहे. शिवशंभू घोडके यांचे कार्य म्हणजे निसर्गाशी असलेली खरी नाळ आणि भविष्यातील पिढ्यांसाठी हिरवळ जपण्याचा प्रामाणिक प्रयत्न होय.

त्यांच्या या हरित साधनेमुळे परिसरात केवळ झाडांची संख्या वाढलेली नाही, तर पर्यावरणाबद्दलची संवेदनशीलताही वृद्धिंगत झाली आहे. ‘फॉरेस्ट मॅन’ म्हणून ओळख मिळवलेले शिवशंभू घोडके हे खऱ्या अर्थाने निसर्गाचे उपासक ठरत आहेत. 


Post a Comment

Previous Post Next Post
BREAKING NEWS : Loading...

ताज़ा खबरें

राजनीति समाचार
राजनीति समाचार लोड हो रहे हैं...