अशोक पाटील तेलंग
लोकप्रिय न्यूज नेटवर्क
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे सर्वात मोठे साधन मानले जाते. परंतु कंधार तालुक्यातील शिक्षण विभागातील भोंगळ कारभार पुन्हा एकदा चव्हाट्यावर आला असून विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ करणारा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वंजारवाडी आणि पांगरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळांना शाळेच्या वेळेतच चक्क कुलूप लागलेले आढळले, तर शिक्षक गैरहजर असल्याचे उघड झाले. हा प्रकार गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी केलेल्या अचानक पाहणीदरम्यान समोर आला आणि संपूर्ण तालुक्यात खळबळ उडाली.
मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पालक दररोज आशेने आपल्या लेकरांना शाळेत पाठवतात. पण त्या शाळाच बंद असतील, शिक्षकच गैरहजर असतील तर त्या निष्पाप विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे काय? हा प्रश्न आता गावकऱ्यांच्या मनात संताप आणि वेदना निर्माण करत आहे.
गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी शिक्षण व्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी अचानक वंजारवाडी आणि पांगरा तांडा येथील जिल्हा परिषद शाळांना भेट दिली. मात्र शाळेच्या वेळेत शाळेचे दरवाजे कुलूपबंद असल्याचे दिसताच त्यांनाही धक्का बसला. परिसरात विद्यार्थी दिसत नव्हते आणि शिक्षकही गैरहजर असल्याचे आढळले. शिक्षणासारख्या पवित्र क्षेत्रात अशी निष्काळजीपणा आणि कर्तव्यच्युती पाहून प्रशासनानेही नाराजी व्यक्त केली.
या घटनेमुळे शिक्षण विभागातील शिस्तीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे स्पष्ट झाले आहे. ग्रामीण भागातील विद्यार्थी आधीच अनेक अडचणींना तोंड देत शिक्षण घेत आहेत. अशा परिस्थितीत शिक्षकांनीच जबाबदारीपासून पळ काढल्यास त्या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा प्रश्न अधिक गंभीर बनतो.
या प्रकारामुळे संतप्त झालेल्या गटविकास अधिकारी महेश पाटील यांनी संबंधित शिक्षकांना तत्काळ ‘कारण दाखवा’ नोटीस बजावली आहे. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की,
“शाळा बंद ठेवून कर्तव्यात कसूर करणाऱ्या शिक्षकांची गय केली जाणार नाही. नोटीसचे उत्तर मिळताच पुढील कारवाई निश्चित केली जाईल.”
शिक्षकांकडून मिळणारे स्पष्टीकरण समाधानकारक नसल्यास दोषी शिक्षकांवर कठोर प्रशासकीय कारवाई केली जाईल, असेही प्रशासनाने स्पष्ट केले आहे. या घटनेनंतर शिक्षण विभागात खळबळ उडाली असून अनेक शिक्षकांमध्येही चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.
दरम्यान, गावकऱ्यांनीही या प्रकाराबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. “आमच्या मुलांचे भविष्य घडवण्यासाठी शाळा आहे. पण शिक्षकच येत नसतील तर मुलांनी शिक्षण घ्यायचे कुठे?” असा संतप्त सवाल पालकांनी उपस्थित केला आहे.
कंधार तालुक्यातील शिक्षण विभागातील या ‘दांडीबहाद्दर’ गुरुजींवर आता खरंच कठोर कारवाई होणार का, की नेहमीप्रमाणे प्रकरण दडपून टाकले जाणार? हा प्रश्न आता सर्वसामान्य नागरिकांच्या मनात निर्माण झाला आहे.
शिक्षण व्यवस्थेची प्रतिष्ठा आणि विद्यार्थ्यांचे भविष्य लक्षात घेता या प्रकरणात प्रशासन कोणती ठोस पावले उचलते, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.

إرسال تعليق