लोकप्रिय न्यूज नेटवर्क
अशोक पाटील तेलंग
कंधार तालुक्यातील पेठवडज (जि. नांदेड) येथे येत्या दि. २० मार्च २०२६ ते २८ मार्च २०२६ या कालावधीत भव्य धार्मिक सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, यात प्रभु श्रीराम जन्मोत्सव सोहळा, शोभा यात्रा, अखंड हरिनाम सप्ताह, श्रीराम कथा सोहळा तसेच रा.स्व.सं. शताब्दी वर्षानिमित्त विराट हिंदू संत सम्मेलन आयोजित करण्यात आले आहे.
या धार्मिक सोहळ्यास परमपूज्य श्री संत दत्त भगवानांचे अनन्य भक्त प्रेमयोगी श्री देहपुरीजी महाराज (श्रीक्षेत्र कन्हाळा दत्त संस्थान) यांचे कृपाशिर्वाद लाभले असून, महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध कथाकार, नर्मदा परिक्रमा दोन वेळा पूर्ण केलेले तपोमूर्ती भागवताचार्य प.पू. श्री अनंत महाराज बेलगावकर यांच्या गोड वाणीतून श्रीराम कथा सादर होणार आहे.
कार्यक्रमादरम्यान विविध धार्मिक व सांस्कृतिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. दि. २६ मार्च रोजी सकाळी १० ते १२ या वेळेत श्रीराम कथा सांगता होऊन दुपारी १२ वाजता श्रीराम जन्मोत्सवाचा गुलाल कार्यक्रम पार पडणार आहे. त्यानंतर भव्य दिव्य मिरवणूक व शोभा यात्रा काढण्यात येणार आहे.
दि. २७ मार्च रोजी सकाळी १० ते १२ गाथा पूजन होईल, तर दुपारी २ ते ५ या वेळेत हिंदू संत सम्मेलन आयोजित करण्यात येणार असून, उपस्थित संत-महात्म्यांचे पूजन, आशीर्वचन व प्रवचन सोहळा पार पडणार आहे.
दि. २८ मार्च रोजी काला व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
संपूर्ण सप्ताहात दररोज धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. पहाटे ४ ते ६ काकडा आरती, सकाळी ७ ते ९ ज्ञानेश्वरी पारायण, सकाळी १० ते १२ गाथा भजन, दुपारी २ ते ५ श्रीराम कथा, सायंकाळी ५ ते ७ हरिपाठ, रात्री ९ ते ११ हरिकीर्तन आणि रात्री १२ ते ४ हरिजागर असे दैनिक कार्यक्रम राहणार आहेत. तसेच दररोज सकाळी ११ वाजता महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सोहळ्यास हिंदुधर्म वक्ते श्री धनाजीराव शिवाजीराव तोंडकर तसेच विशेष अतिथी म्हणून गोवंश व बीज संशोधन अखिल भारतीय प्रमुख, भारतीय किसान संघाचे कार्यकारिणी सदस्य डॉ. पद्मश्री वदा लाड उपस्थित राहणार आहेत.
हा भव्य धार्मिक सोहळा श्री महर्षी वाल्मिक मंदिर व श्रीराम मंदिर, पेठवडज (ता. कंधार, जि. नांदेड) येथे पार पडणार असून, पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून ज्ञानामृताचा व संत दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

إرسال تعليق