लोकप्रिय न्यूज नेटवर्क
अशोक पाटील तेलंग
कंधार तालुक्यातील मो. जाकापूर येथे धार्मिक आणि आध्यात्मिक वातावरणात अखंड हरिनाम सप्ताह वर्ष ६१ वे तसेच श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यामुळे संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले असून भाविकांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे.
या धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन जाकापूर येथील संत सेवेच्या परंपरेतून करण्यात आले असून श्री संत कुपे हनुमान मंदिर, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिर आणि श्री मारुती मंदिर परिसरात हा सोहळा पार पडत आहे. दिनांक ९ मार्च ते १६ मार्च २०२६ या कालावधीत अखंड हरिनाम सप्ताह साजरा होत आहे.
सप्ताहादरम्यान दररोज पहाटे काकड आरतीने कार्यक्रमाची सुरुवात होते. सकाळी श्री ग्रंथराज श्री ज्ञानेश्वरीचे सामुदायिक पारायण, गाथा भजन, दुपारी हरिपाठ तर रात्री हरिकीर्तन आणि प्रवचनांचे आयोजन करण्यात आले आहे. दररोज विविध भागातील नामवंत कीर्तनकार आणि प्रवचनकार भक्तांना अध्यात्मिक मार्गदर्शन करीत आहेत.
या सप्ताहात ह.भ.प. विकास महाराज दसवाडीकर, ह.भ.प. आशाताई सुनील राऊत (लातूर), ह.भ.प. हिंदविताई पाटील रातोलीकर, ह.भ.प. सतीश महाराज शास्त्री ( जालना), ह.भ.प. पंडूरंग महाराज हाडोळी , ह.भ.प. मधुसूदन महाराज (कापसी) आणि ह.भ.प. वासुदेव महाराज कोलंबी यांचे किर्तन व प्रवचन आयोजित करण्यात आले आहे. सप्ताहाच्या शेवटच्या दिवशी ह.भ.प. नामदेव महाराज दापका यांचे काल्याचे कीर्तन होणार असून त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
या सप्ताहासाठी गावातील सर्व ग्रामस्थ, भजनी मंडळे, सेवेकरी आणि दानशूर व्यक्तींनी मोठ्या उत्साहाने सहकार्य केले आहे. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध समित्या कार्यरत असून भाविकांसाठी महाप्रसाद व निवासाचीही व्यवस्था करण्यात आली आहे.
या अखंड हरिनाम सप्ताहामुळे जाकापूर व परिसरात भक्ती, ज्ञान आणि अध्यात्मिकतेचा संदेश पसरत असून मोठ्या संख्येने भाविक उपस्थित राहून हरिनामाचा लाभ घेत आहेत.

إرسال تعليق